सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून परीक्षेची नवी तारीख जाहीर
पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षांचा गोंधळ कायम आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षेला 12 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा पुरता गोंधळ उडाल्याचे दिसून आले. त्यानंतर परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंळवारीसुद्धा परिस्थिती सारखीच राहिली. परंतु आता याबाबत तांत्रिक अडचणी मिटल्या असून मंगळवारी रद्द झालेल्या 5 विषयांच्या परीक्षा शनिवारी होणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केले आहे.
पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 12 ऑक्टोबरपासून सुरु झाली. मात्र पहिल्याच दिवशी ऑफलाईन परीक्षेचा खोळंबा झाल्याचे दिसले. विद्यापीठाकडून ऑनलाईन पाठविल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकांची प्रिंट घेण्यासाठी आवश्यक असणारा ओटीपी न मिळाल्याने पहिल्या सत्रातील परीक्षा ठप्प झाली. त्यानंतर सकाळी 10 वाजताचा पेपर दुपारी 12 वाजता सुरू झाला.
तर ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांना ऐनवेळी लॉग इन आयडी आणि पासवर्ड न मिळाल्याचे प्रकार समोर आले. तसेच अचानक काही अडचण आली तर विद्यार्थ्यांना तक्रार करण्यासाठी दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर फोन केल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याचे विद्यार्थांकडून सांगण्यात येत आहे.