सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राडा, कुलगुरूंना ABVP च्या विद्यार्थ्यांनी घातला घेराव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Anil-thomabare.jpg)
पुणे । प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मोठा गदारोळ झाला असून, अखिल भारतील विद्यार्थी परिषदेने पुंगी बजाव आंदोलन केलं आहे. विद्यापीठातील विविध विभागांतील परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं आहे.यावेळी पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरू उमराणी सरांना अभाविप कार्यकर्त्यांनी घेराव घातला.
विशेष म्हणजे आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत उपकुलगुरु यांच्या गाडीला घेराव घातला. उपकुलगुरु एन. एस. उमराणी यांना धकाबुक्कीसुद्धा करण्यात आली आहे. जोपर्यंत कुलगुरू बाहेर येत नाहीत, तोपर्यंत आम्ही जाणार नसल्याचंही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलकांनी सांगितलं आहे. गेल्या दीड तासांपासून आंदोलन सुरू आहे. कुलगुरूच्या राजीनाम्याची मागणीसुद्धा आंदोलकांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या परीक्षेतील घोळ काही कमी होताना दिसत नाही. अंतिम वर्षाच्या परीक्षेतील अडचणींबाबत विद्यार्थ्यांकडून आतापर्यंत 13 हजारांपेक्षा अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या अडचणी दूर करण्याचं काम विद्यापीठाकडून सुरू करण्यात आलं आहे. परीक्षेदरम्यान लॉगिन न होणं, प्रश्न न दिसणं, आकृत्या न दिसणं, उत्तरपत्रिका सबमिट न होणं, सर्व्हर जाणं अशा अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला होता.