शंभरावे नाट्य संमेलन रद्द, बैठकीत आयोजकांचा निर्णय
26 मार्च रोजी सांगलीत होणार होते संमेलन
पुणे |महाईन्यूज|
कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजवला आहे. सिनेमांपासून ते खेळांपर्यंत प्रत्येक क्षेत्रावर याचा परिणाम झालेला दिसतो. एकीकडे मोठमोठ्या कार्यक्रमांपासून ते सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखा बदलत आहेत. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे अखिर भारतीय मराठी नाट्य परिषदेने 100 वे नाट्य संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. नाट्य परिषदेचे अध्यक्ष नवनाथ कांबळी यांनी पत्रक प्रसिद्ध करून याबद्दल माहिती दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे नाट्य संमेलन सध्या तात्पुरतं रद्द करण्यात आलं असून अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं आहे. 25 मार्चपासून यंदा शंभरावं अखिल भारतीय नाट्यसंमेलन होणार होतं. मात्र, राज्यात कोरोनाचा फैलाव झाला आहे. कोरोनाचे राज्यात 14 रुग्ण आढळले आहेत. खबरदारी म्हणून अनेक मोठे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर नाट्य संमेलनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात 18 मार्चला महत्त्वाची बैठक होणार आहे.