विकास कामांपासून राजकीय जोडे दूर ठेवा: सुनील शेळके यांचे मत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/Shelke.jpg)
वडगाव मावळ, (वार्ताहर) – ग्रामपंचायतीच्या विकास कामासाठी सर्वांनी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून एकत्रित आल्यास विकास कामाची गंगा वाहते. औद्योगीक क्षेत्र तसेच मुबलक पाणी असलेल्या आंबी, वारंगवाडी, गोळेवाडी व राजपुरी गावांच्या आंबी ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये अत्याधुनिक ग्रामपंचायत कार्यालय इमारत, सभा मंडप, शाळा अंतर्गत कॉंक्रीट रस्ते केले आहे. निवडणुका पुरतेच राजकारण करा, अन्य वेळी गावच्या विकासासाठी एकत्र येवून गावात विकास कामे करून विकासाचे ग्राम मॉडेल तयार करण्यासाठी पुढाकार घ्या, असे प्रतिपादन तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी केले.
आंबी ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या नूतन इमारतीचे तसेच मंदिराच्या सभा मंडपाच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षा माजी सरपंच मंगल रामनाथ घोजगे, मंदिराच्या सभा मंडपाच्या कामाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष समाज भूषण ह.भ.प. धोंडिभाऊ घोजगे होते. मान्यवरांच्या हस्ते विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.
शेळके म्हणाले, आंबी ग्रामपंचायत हद्दीत “एमआयडीसी’ च्या पाणी पुरवठा योजना सुरू करून पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करण्यासाठी ग्रामस्थांसह प्रयत्न करू. ग्रामस्थ व सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करावा. अपूर्ण विकास कामांसाठी केव्हाही आवाज द्या, मी तत्पर आहे. यावेळी प्रादेशिक परिवहन विभाग सेवानिवृत्त अधिकारी हरिश्चंद्र गडसिंग व आरपीआय जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी भाषण केले. उप नगराध्यक्ष सुनील शेळके यांच्या वतीने अपूर्ण विकासासाठी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. ग्रामस्थांनी सुनील शेळके यांच्या आर्थिक मदतीचे स्वागत केले.
ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे संस्थापक विलास काळोखे, नगरसेवक संदीप शेळके, अमोल शेटे, नगरसेविका वैशाली दाभाडे, अनिता पवार, सरपंच नंदाबाई घोजगे, उपसरपंच जितेंद्र घोजगे, नवलाख उंब्रेचे सरपंच दत्तात्रय पडवळ, माजी सरपंच वामन वारिंगे, तंटामुक्तीचे अध्यक्ष रामनाथ घोजगे, विक्रम कलावडे, रामनाथ कलावडे, बबनराव घोजगे, विष्णू गोळे, प्रदीप बनसोडे, जयश्री घोजगे, मेघा बनसोडे, जयश्री लंके, बायडाबाई गराडे, किसान शिंदे, सुवर्णा शिंदे, प्रा. सुरेश घोजगे, ग्रामसेविका रुपाली व्यवहारे उपस्थित होते.
दत्तात्रय वारिंगे यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच जितेंद्र घोजगे यांनी आभार मानले.