लोहगांव विमानतळाला “जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज विमानतळ” नाव द्या
![Lohgaon Airport "Jagadguru Shri Sant Tukaram Maharaj Vimanat"](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/varkari.jpg)
– अखिल भारतीय वारकरी मंडळाचा निर्धार
पिंपरी | प्रतिनिधी
लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला “जगद्गुरू श्री. संत तुकाराम महाराज विमानतळ” नाव द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. वारकरी मंडळ पश्चिम महाराष्ट्र विभागीय कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान व पदग्रहन कार्यक्रम प्रसंगी या मागणीबाबतचा ठराव एकमताने संमत करण्यात आला.
लोहगाव-वाघोली रस्त्यावरील गाथा लॉन्स मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमप्रसंगी भाजपाचे पुणे शहराध्यक्ष तथा माजी आमदार जगदीश मुळीक, माजी आमदार बापूसाहेब पठारे, राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले, सुप्रसिद्ध गायक पंडीत कल्याण गायकवाड, केंद्रीय सदस्य हभप शंकर महाराज शेवाळे, प्रदेशाध्यक्ष हभप अनिल महाराज वाळके, हभप आसाराम महाराज बढे, भाजपा वडगावशेरी मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष (लाला) खांदवे-पाटील, बंडू खांदवे, लोहगांवचे माजी उपसरपंच सुनिल खांदवे-मास्तर, नवनाथ मोझे, युवराज शिंदे, गणेश डावरे, राजाभाऊ भाडळे, सुखदेव ठाकर, विजय भोंडवे तसेच अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राज्य, विभागीय, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदगुरुनाथ माऊलीनाथ महाराज वाळुंजकर, पं.पू.सुमंतबापू हंबीर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
श्री संत तुकाराम महाराजांचे आजोळ असणारे श्री क्षेत्र लोहगाव या गावी छत्रपती शिवराय संत तुकाराम महाराजांच्या किर्तनातमध्ये येत असत. त्या काळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या निस्सीम भक्तीचे याच गावात अनेक चमत्कार भाविक भक्तांना अनुभवास मिळाले. श्री संत तुकाराम महाराजांचे बरेचसे बालपण याच लोहगावात गेले. त्यांच्या पवित्र मुखातून स्फुरलेले गाथेतील बरेचसे अभंग याच पुण्यभूमीतले आहेत. याच गावच्या पावन भूमीमध्ये सध्या विमानतळ असल्यामुळे लोहगाव विमानतळाला “जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज विमानतळ” नाव द्यावे असा ठराव एकमताने संमत करुन मागणी करण्यात आली.
सुत्रसंचालन संदीप बोत्रे यांनी केले. तर आभार ऍड.आदित्य खांदवे यांनी मानले. त्यानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
चौकट : शासनदरबारी पाठपुरावा करणार :
देशातील विविध विमानतळांना महापुरुष व संत महात्म्यांची नावे आहेत. त्याचप्रमाणे लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला “जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे माजी आमदार जगदीश मुळीक व बापूसाहेब पठारे म्हणाले.