राम, धर्मांचा मुद्दा सोडा अनं विकासाचा मार्ग धरा – भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेचा घरचा आहेर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/pp4-5.jpg)
पुणे – राम मंदिराचा मुद्दा सोडा आणि आता पुन्हा विकासाचा मार्ग धरा, असा घरचा आहेर भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पाच राज्याच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर दिला आहे.
संजय काकडे म्हणाले, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमधील भाजपचा पराभव खूप काही सांगून जातो. या तीन राज्यात भाजप सर्वाधिक मजबूत आहे. 2014 साली या तीन राज्याने भाजपचे 62 खासदार लोकसभेत निवडून दिले होते तर काँग्रेसचे केवळ तीन खासदार जिंकले होते. मध्यप्रदेशमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद मोठी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह उजव्या विचारसरणीच्या संघटनाचे जाळे येथे एवढे मोठे असतानाही पक्षाचा पराभव होतो याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लोकांना विकास हवा असतो त्यामुळे धर्म, राम मंदिर, शहराची नामकरण, पुतळे आदी मुद्यांमुळे मतदारांवर नकारात्मक परिणाम झाला. आता भाजपने मोदींच्या 2014 च्या अजेंड्यावर लक्ष केंद्रित करून विकासावर बोलले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहांसारखे नेते असतानाही पक्षाला पराभवाला सामोरे जाणे चिंताजनक आहे, असा सल्लाही काकडे यांनी दिला.