breaking-newsपुणे

‘राणी’ व ‘राधा’ या दोघी बहिणी पुणे पोलीस दलातून निवृत्त

पुणे पोलिसांना अनेक गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे गुन्हे अन्वेषण शाखेचे ( एलसीबी) श्वान ‘राणी’ आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकातील (बीडीडीएस) श्वान ‘राधा’ हे दोन श्वान निवृत्त झाले आहेत. हे दोन्ही श्वान तब्बल दहा वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झालेत. हे दोन श्वान म्हणजे पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण व बॉम्ब शोधक-नाशक पथकातील गुन्हे शोधक श्वान पथकाची शान होत्या.

वयाच्या दुसऱ्या महिन्यापासून लॅबराडोर जातीचे हे दोन्ही श्वान पोलीस दलात दाखल झाले होते. त्यानंतर दोघांना नऊ महिन्यांचे शिस्तबद्ध पोलीस प्रशिक्षण देण्यात आले होते. दोन महिन्यांच्या असताना पुणे पोलिसांच्या श्वान पथकात दाखल झालेल्या राणी पाठोपाठ तिचीच बहीण राधाचाही समावेश झाला होता. गेल्या दहा वर्षांमध्ये यातील राणीने अनेक गुन्ह्यांचा छडा लावला. तिने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी बजावली म्हणून अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात देखील आले आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथकातील (बीडीडीएस) श्वान ‘राधा’ हिची देखील पोलिसांना विविध गंभीर घटनांमध्ये मोलाची साथ मिळाली होती.

पुणे जिल्ह्यातील शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील ऊस तोड महिलेचा खून, खेड तालुक्यातील आव्हाटवाडी खून प्रकरण, बारामती मधील भांबुर्डी येथील चिंकारा शिकार प्रकरण, रांजणगाव ( ता. शिरूर) येथील महिलेचे खून प्रकरण, शिरूर मधील एसबीआय बॅंकेवरील दरोडा, दौंड तालुक्यातील दरोड्यातील आरोपींचा छडा, जेजुरी येथील अल्पवयीन मुलीचे बलात्कार व खून, तक्रारवाडी ( भिगवण) येथील अल्पवयीन बेपत्ता मुलाचा खून अशा प्रत्येक वेळेस गुन्हेगाराचा माग काढण्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका राणी श्वानाने बजावली होती.

तब्बल दहा वर्षाच्या सेवेनंतर या दोन्ही श्वानांना पुणे ग्रामीण पोलिसांनी एका खास कार्यक्रमात शुक्रवारी (दि. 30 नोव्हेंबर) सन्मानाने निवृत्ती दिली. पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे निवृत्तीच्या वेळी राणी व राधाचे हँडलर ( हस्तक) पोलीस नाईक गणेश फापाळे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय चौधरी, एलसीबीचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत पवार आदी उपस्थित होते.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button