राज्यातील ३० हजार ८२० संस्थांच्या निवडणूका घेण्याची प्राधिकरणाची तयारी
![2022, Uttar Pradesh Legislative Assembly election](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/voter-list-on-may-21-valid-for-the-municipal-corporation-elections_20180586792.jpg)
पुणे – कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा अखेर उडणार आहे. ३१ डिसेंबरनंतर राज्यातील ३० हजार ८२० सहकारी संस्थांची निवडणूक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची तयारी सुरु आहे. टप्प्याटप्प्याने या निवडणुका घेण्यात येणार आहेत.
सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ५ हजार ६२८ जणांचे पॅनलही मंजूर करण्यात आले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीला ३१ डिसेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता २०२१च्या सुरुवातीलाच सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे राजकारण तापणार आहे. राज्यात एकूण ४५ हजार २७६ सहकारी संस्थांची निवडणूक बाकी आहे. त्यापैकी क आणि ड वर्गातील ३० हजार ८२० सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी प्राधिकरणाची तयारी सुरु आहे.
राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेसाठी जानेवारीमध्ये या निवडणुका ३ महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने १७ मार्चला पुन्हा ३ महिन्यांचा कालावधी वाढवण्यात आला. पुढे अजून दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. आता अखेर ३१ डिसेंबरनंतर म्हणजे नव्या वर्षाच्या सुरुवातीला या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे. तशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त जगदीश पाटील यांनी दिली आहे.