राज्यातील लोकनाट्य कलाकेंद्र सुरू करण्याचे शरद पवारांचे आश्वासन
![Farmers insist on repeal of Agriculture Act- Sharad Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/xsharad-pawar.jpg)
पुणे – कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे राज्यातील बंद करण्यात आलेली लोकनाट्य कलाकेंद्र काही नियम आणि अटी घालून सुरू करण्यास राज्य सरकार परवानगी देईल, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले, अशी माहिती राज्य थिएटर मालक संघाचे अध्यक्ष डॉ. अशोक जाधव यांनी दिली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका इतर क्षेत्रांप्रमाणे तमाशालाही बसला आहे. लॉकडाऊनमध्ये बेरोजगारी आणि उपासमारीचे संकट कोसळलेल्या या तमाशा कलावंतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वेल्फेअर फंडातून शरद पवार यांनी मदत दिली. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी डॉ. अशोक जाधव, अभयकुमार तेरदाळे आणि जयश्री जाधव यांनी बारामतीत शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. राज्यात ७० लोककला केंद्र असून त्यात जवळपास १४ हजार कलावंत काम करतात. हे केंद्र बंद असल्यामुळे कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे इतर उद्योगांप्रमाणे लोककलावंतांनाही अटी आणि नियम घालून परवानगी द्यावी आणि लॉकडाऊननंतर सरकारने लावणी महोत्सव भरवावेत, अशीही मागणी जाधव यांनी यावेळी केली.