राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर
पुणे |महाईन्यूज|
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शुक्रवारी (ता.12) तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. शनिवारी आणि रविवारी त्यांच्या उपस्थितीत शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यपाल कोश्यारी यांचे येथील राजभवनात आगमन झाले. विभागीय आयुक्त सौरभ राव, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलिस उपायुक्त मितेश घट्टे, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, मावळचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.
कोश्यारी यांच्या हस्ते 12 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता वाघोली येथील लेक्सिकॉन कॅम्पसमध्ये ‘द लेक्सिकॉन लिडरशिप ऍवार्ड’ प्रदान कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी पाच वाजता राजभवन येथे लहान मुलांवरील हिंदी कवितावर आधारित चित्रसंग्रही पुस्तकाचे प्रकाशन होईल. तसेच, 13 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सुषमा नहार संपादित ‘गुरु ग्रंथ साहिबमधील संत नामदेव’ या पुस्तकाच्या विशेष आवृत्तीचे प्रकाशन करण्यात येणार आहे.