रस्ता खोदल्याने वाहतुकीस अडथळा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरासह विविध ठिकाणी रस्ता खोदाई मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तसेच विविध केबल कंपन्यांनी ठेकेदाराने केबल टाकण्यासाठी सर्वत्र खोदला आहे. वाल्हेकरवाडी ते रावेत मुख्य बीआरटीएस चौकापर्यंतचा रस्ता अर्धवट बुजविल्याने येथील अपघात आणि वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे खड्डे पूर्णपणे बुजवून रस्ता दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
महावितरण कंपनीने या मार्गावर विविध ठिकाणचे रस्ते आणि पदपथ खोदल्याने रावेतकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच सेवा उपयोगिता कंपन्यांनी केबल टाकण्यासाठी चर खणण्यास सुरुवात केली आहे. परिणामी वाल्हेकरवाडी, रावेत, किवळे या रस्त्यांचा पुरता बोजवारा उडाला आहे. ‘खड्डेच खड्डे चोहीकडे’ अशी परिस्थिती आहे. अनेक ठिकाणचे लहान-मोठे रस्ते खड्डे खणून ठेवल्यामुळे व काही अर्धवट अवस्थेत बुजविल्याने त्याचा राडारोडा रस्त्यावर पडलेला आहे. काही ठिकाणी केबल व्यवस्थित न लावल्याने रस्त्यावरच पडून आहेत. त्यामुळे वाहतुकीचे मार्ग वळवावे लागले आहेत. काही ठिकाणी रस्ता खोदून, अर्धा रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे. मात्र वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या निम्म्या रस्त्यावर वाहनांची प्रचंड कोंडी होत आहे. त्याचा फटका पादचाऱ्यांनाही बसू लागला आहे. काही पदपथांवरील पेव्हर ब्लॉक या कामासाठी उखडण्यात आले आहेत. हे ब्लॉक रस्त्यावर पडून असल्याने वाहतुकीस अडथळा ठरत आहे. पदपथ खोदल्याने पादचाºयांना रस्त्यांवरून चालावे लागत आहे.