मुलाला वाचविताना आईसह तिघांचा मृत्यू, पुण्याच्या वाघोलीतील घटना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/drowning-case_20171130435.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
कपडे धुण्यासाठी गेलेल्या आई, मुलाचा आणि त्या दोघांना वाचवणा-या एकाचा अशा तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील वाघोलीच्या भैरवनाथ तलावामध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रोहिणी संजय पाटोळे (३५), स्वप्नील संजय पाटोळे (१२) आणि दत्तात्रय रघुनाथ जाधव (३७) अशी तिघांची नावे आहेत. तिघेही मृत वाघोलीचे राहणारे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिणी पाटोळे या मुलगा स्वप्नीलला सोबत घेऊन भैरवनाथ तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. रोहिणी या कपडे धुत असताना, स्वप्निल तलावाच्या बाजूला खेळत होता. तो पाण्यात पडला. रोहिणी यांनी त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. पण आई आणि मुलगा हे दोघे पाण्यात बुडू लागले. हे रस्त्याने जाणारे दत्तात्रय जाधव यांना दिसताच त्यांनी देखील दोघांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली.
मात्र, या घटनेत तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून दत्तात्रय जाधव यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. माय लेकाचा मृतदेह शोधण्याचे काम चालू असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी लोणीकंद पोलीस शोध घेत आहे.