मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/pune-accident1_201809129613.jpg)
पुणे – मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात एक विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात सुमारे 10 वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी (6 सप्टेंबर) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. भरधाव वेगात जाणाऱ्या एका आयशर टेम्पोचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या रोपला तो धडकला. त्यामुळे त्याच्या पाठोपाठ वेगाने आलेली वाहने एकामेकांवर धडकली. यामध्ये 5 कार, 4 ट्रक आणि एका टेम्पोचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरघाटात सकाळी 6 वाजता एक ट्रक आणि कंटेनर यांचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला होता. ही वाहने बाजूला काढण्याचे काम सुरु असल्याने महामार्गावरील एक लेन बंद होती. या दरम्यान अपघातापासून काही किलोमीटरवर एक आयशर ट्रक रस्त्याच्या उजव्या बाजूने वेगाने जात असताना त्याचे नियंत्रण सुटले व तो रस्त्याच्या दुभाजकावर असलेल्या रोपला जाऊन धडकला. या रोपला धडकल्यानंतर तो मधल्या लेनमध्ये आल्यामुळे त्याच्या पाठोपाठ वेगाने आलेल्या काही गाड्या या एकमेकांवर आदळू लागल्या. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील या विचित्र अपघातात काही गाड्यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/pune-accident_201809129612-1-300x225.jpg)