महापालिका प्राधिकरणाला दोन कोटी रुपये मोजणार!
![Pimpri Chinchwad Navnagar Development Authority merger notification issued!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/PCNTDA.jpg)
पिंपरी – मोशी – बोऱ्हाडेवाडी येथील पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनटीडीए) ताब्यातील 16 गुंठे जागा उद्यान, खेळाचे मैदान, शाळा बांधण्याकरिता महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे. ही जागा हस्तांतरीत करण्यासाठी 2 कोटीच्या या भूखंडाचे अधिमुल्य महापालिकेला भरावे लागणार आहे.
महापालिका नगररचना व विकास विभागाने मोशी – बोऱ्हाडेवाडी येथील पीसीएनटीडीएच्या ताब्यातील सेक्टर क्रमांक 5 अणि 8 मधील 16 गुंठे जागा उद्यान, खेळाचे मैदान, शाळा बांधण्याकरिता महापालिकेस जागा हस्तांतरण करण्याबाबत कळविले होते. त्यास अनुसरून पीसीएनटीडीएच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित जागा निवासी वापराची असून तिचे मूल्य 2 कोटी 7 लाख 36 हजार रूपये आहे. 12 हजार 960 प्रति चौरस मीटर दराने ही रक्कम भरण्यास महापालिका तयार आहे का ? अशी विचारणा केली. तसेच तयारी असल्यास महापालिका आयुक्तांमार्फत कळविण्यास सांगितले होते.
बोऱ्हाडेवाडी येथे उद्यान, खेळाचे मैदान, शाळा बांधणे गरजेचे असल्याने याबाबतची अंमलबजावणी करण्यास महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली. त्यानुसार, महापालिकेस आवश्यक जागा हस्तांतरीत करण्यासाठी 2 कोटी 7 लाख 36 हजार रूपये भुखंडाच्या अधिमुल्यासह भाडेपट्टा करार नोंदविण्यात येणार आहे.