मराठा क्रांती मूक मोर्चात फूट, महिलांकडून स्वतंत्र समितीची स्थापना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/Maratha-Kranti-Morcha.jpg)
मराठा समाजातील महिलांना बैठकांना बोलवलं जात नसल्याने पुण्यातील काही महिलांनी एकत्रित येत सकल मराठा महिला क्रांती मोर्चाच्या समितीची स्थापना करण्याची घोषणा केली. मात्र या घोषणेवेळी मराठा क्रांती मूक मोर्चातील काही महिलांनी पत्रकार परिषदेत येऊन समितीवर आक्षेप घेतला. त्यामुळे मराठा क्रांती मूक मोर्चात फूट पडल्याचे दिसत आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मागील दोन वर्षात तब्बल 58 मूक मोर्चे काढण्यात आले. यादरम्यान अनेक वेळा समन्वयकांच्या बैठकादेखील झाल्या. अशीच एक बैठक 1 सप्टेंबर रोजी पुण्यात आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला महिलांना बोलवलं नाही म्हणून आज पुण्यातील महिलांनी सकल मराठा महिला क्रांती मोर्चाची राज्य समिती स्थापन केली. या समितीची घोषणा करण्यासाठी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर मराठा क्रांती मूक मोर्चातीलच काही महिला त्या ठिकाणी आल्या आणि समितीविरोधात विरोध दर्शविला. याबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी तुमचे बोलणं झाले आहे का असा सवाल मराठा क्रांती मोर्चाच्या पूजा झोळे यांनी उपस्थित केला.
त्यावर महिला क्रांती समितीच्या उषा पाटील म्हणाल्या की, आजवर अनेक मोर्चामध्ये सहभागी झालो. मात्र अनेक बैठकांमध्ये महिलांना डावलण्याचा प्रकार घडला. असाच प्रकार 1 तारखेच्या बैठकीत घडल्याने अखेर स्वतंत्र सकल मराठा महिला क्रांती मोर्चाच्या समितीची स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आता महिलांची भूमिका मांडण्यासाठी 7 तारखेला पुण्यात राज्यस्तरीय पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी महिलांची संख्या यांना समजेल अशा शब्दात त्यांनी भूमिका मांडली.