भीमा-कोरेगावचा तपास NIA कडे देण्याला राज्य सरकारचा पुणे कोर्टात विरोध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/NIA-copy.jpg)
पुणे | भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) देण्याला शुक्रवारी पुणे सत्र न्यायालयात राज्य सरकारच्या वकिलांनी विरोध केला. काही दिवसांपूर्वीच हे प्रकरण एनआयएकडे देण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला होता. पण तेव्हापासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून त्याला विरोध केला जात आहे.
राज्य सरकारकडून युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी हे प्रकरण एनआयएकडे देण्यात येऊ नये, अशी मागणी केली. हे प्रकरण कोणत्या कारणांमुळे पुणे पोलिसांकडून एनआयएकडे देण्यात यावे, याचे प्रबळ कारण देण्यात आलेले नाही. पुणे न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस आर नावंदर यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. आता ते १४ फेब्रुवारीला आपला निकाल देणार आहेत.
पुणे न्यायालयाच्या परिक्षेत्रात हे संपूर्ण प्रकरण घडले आहे. पुणे पोलिसांनी त्याचा तपास पूर्ण केला असून, या प्रकरणी आरोपपत्रही दाखल केले असल्याकडे उज्ज्वला पवार यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.