भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दादासाहेब तोरणे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन
![Greetings on the occasion of the death anniversary of Dadasaheb Torne, who marked the beginning of Indian cinema.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/chitrpat.jpg)
पुणे | प्रतिनिधी
भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शिलेदारांपैकी एक, ज्यांनी ‘पुंडलिक’ हा चित्रपट बनविणारे दिग्दर्शक निर्माते रामचंद्र गोपाळ ऊर्फ दादासाहेब तोरणे यांच्या ६१ व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सदस्य अनिल तोरणे यांचे ते वडील होत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पुणे कार्यालयामध्ये त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यात आली. या वेळी दादासाहेब तोरणे यांच्या कुटुंबातील सदस्य, त्यांचे पुत्र अनिल तोरणे व त्यांची पत्नी मंगला तोरणे हे उपस्थित होते. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी आदरांजली वाहिली. त्यांनतर महामंडळाचे मा. खजिनदार संजय ठुबे, समिती सदस्य अनिल गुंजाळ, महामंडळाच्या सातारा येथील शाखा प्रमुख महेश देशपांडे, दादासाहेबांवर आधारित पुस्तक ज्यांनी लिहिले शशिकांत किणीकर, दादासाहेब तोरणे यांचे कुटुंबीय व उपस्थित सभासद कलावंत यांनी ही दादासाहेबांना आदरांजली वाहिली. उपस्थित मान्यवरांनी दादासाहेबांच्या कर्तुत्वाला व आठवणींना उजाळा दिला.
चित्रपटसृष्टीतील कर्तृत्ववान पुण्याचे रहिवासी दादासाहेब तोरणे यांनी तयार केलेला ‘पुंडलिक’ हा चित्रपट (मूकपट) १८ मे, १९१२ रोजी मुंबईत प्रदर्शित झाला. नंतरच्या काळात त्यांनी पुण्यातून ‘सरस्वती सिनेटोन’ या चित्रसंस्थेतर्फे २० दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली. जयश्री, शाहू मोडक, रत्नमाला, दादा साळवी, शांता आपटे, दिनकर कामण्णा आदी कलावंतांना पदार्पणाची संधी दिली. पहिली दुहेरी भूमिका ‘औट घटकेचा राजा’त सादर केली. पहिला रौप्यमहोत्सवी ‘शामसुंदर’ चित्रपट ‘सरस्वती सिनेटोन’चाच होता. ते वितरक, उत्कृष्ट संकलक होते आणि मूक पटांच्या काळात त्यांनी ऑडिओ स्टुडिओ पुण्यात सुरू केले होते. दरवर्षी एप्रिलमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात दादासाहेब तोरणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पारितोषिक सुरू करावे. महाराष्ट्र शासन सिने क्षेत्रातील अनेक उपक्रम, संग्रहालय, पुरस्कार आहेत. त्यामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख करून त्यांची स्मृती जतन करावी, अश्या मागण्यांचे पत्र त्यांच्या कुटुंबीयांनी संस्थेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याकडे दिले.