breaking-newsताज्या घडामोडीपुणे

भाजपला राजकारणात रस, पण राजकारण करण्याची ही वेळ नाही : खासदार वंदना चव्हाण

पुणे । महाईन्यूज  । प्रतिनिधी

खासदार गिरीश बापट व भाजपा अध्यक्ष यांनी नुकतेच पालकमंत्री अजितदादा पवार यांच्यावर टिका केली आहे. तसेच त्यांच्या पक्षातील इतर वरिष्ठ पदाधिकारी देखील बेजबाबदार विधाने करीत आहेत. त्यामुळे या आपत्तीतही भाजपाला नागरिकांच्या आरोग्यापेक्षा राजकारणात अधिक रस असल्याचे दिसून येत आहे, अशी टीका खासदार वंदना चव्हाण यांनी केली आहे.

चव्हाण यांनी म्हटले आहे की, वास्तविक महापौर मुरलीधर मोहोळ हे स्वत:च महापालिका आयुक्तांच्या कार्यपध्दतीचे कौतुक करीत होते तर दुसरीकडे मात्र त्यांच्याच पक्षाचे इतर पदाधिकारी व महापालिकेतील गटनेते यांना न जुमानता श्रेय केवळ स्वत:ला लाटण्यासाठीच अधिक धडपड करत होते. मग अचानक असे नेमके काय झाले की, त्यांना आता प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करावे लागत आहे ? महापौर या नात्याने त्यांनी प्रशासन , महापालिकेतील सर्व पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, शहरातील आमदार आणि खासदार व तसेच या महामारीच्या वेळेस मार्गदर्शन करू शकणारया प्रतिष्ठित नागरिक यांच्याशी समन्वय घडवून महापौर म्हणून आपली जबाबदारी पार पाडणे अपेक्षित होते परंतु तसे घडले नाही. नगरसेवक आपापल्यापरिने काम करीत असताना दिसतात मात्र प्रशासनाचा समन्वय नसल्यामुळे आणि हे काम महापौरांचे असल्याने, जी दिशा मिळायला पाहिजे ते घडू शकले नाही. म्हणूनच राष्ट्रीयस्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱयांनीही भाजपच्या नगरसेवकांची खरडपट्टी केली आहे.

आंदोलनाचा इशारा देणारे आणि पालकमंत्री अजितदादा पवार यांना निशाणा करणारे शहरातील भाजपचे खासदार गिरीश बापट गेल्या ५५ दिवसांपासून कोठे होते ? असा प्रश्न अनेकजण विचारत आहे . कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण कसबा, कॅंन्टोंनमेंट आणि पर्वती विधानसभा मतदारसंघात आहेत परंतु तेथील आमदार हे निष्क्रीय असल्याचे अनेक घटनांतून दिसून आले आहे.

शहरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात यावी म्हणून पालकमंत्री अजित पवार यांनी गेल्या दोन महिन्यांत पुण्यात सात बैठका घेतल्या. महापालिकेला मदतीसाठी चार IAS अधिकारी नेमले. कोरोनासाठी वैद्यकीय साधने, उपकरणांसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. ससून हाॅस्पिटल ला अतिरिक्त ५५ कोटी रूपयांचा निधी देवून तिथे तातडीने कोव्हिड हाॅस्पिटल उभे केले.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गेल्या काही दिवसांत शहराचा तीन वेळा दौरा करून ससून हाॅस्पिटल , नायडू हॉस्पिटलची पाहणी करून आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांची बैठक घेतली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही शहराचा दौरा करून पोलिसांचे मनोबळ वाढविण्याची कामगिरी बजावली आहे.

कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय निर्माण व्हावा, अशी भूमिका पक्षाने घेतली. तसेच त्यासाठीविविध सूचनाही वारंवार पक्षाने प्रशासनाला केल्या. विलगीकरण कक्षामध्ये असलेल्या त्रुटी , टेस्टिंगच्या प्रक्रियेत होणारा हलगर्जीपणा, तसेच सर्व समान्य नागरिकांवर येणारया समस्यांचे निराकरण करण्यासाठी अधिकारयांशी संपर्क साधून पुढाकार घेत आहे. तसेच पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून लोकांना मदत करीत आहेत. तर भाजप चे खासदार आणि अध्यक्ष निवेदनं देवून, आंदोलनाचा इशारा देवून फक्त राजकीय स्टंटबाजी करत आहेत हे उघडपणे दिसत आहे.

महानगरपालिकेचा कारभार आपण चालवू शकत नाही म्हणून स्वत:च्या अपयशाचे खापर इतरांवर फोडून आपली असमर्थता झाकली जाईल असे वाटत असले तर जनता सुज्ञ आहे याची आठवण यांना असावी. कोरोनाचा फैलाव भारतात सुरू होत असताना काही ताताडीचे निर्णय केंद्र सरकारने घेणे अपेक्षित होते परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही जसे की, मार्च महिन्यात जेव्हा कोरोना बाधितांची संख्या भारतात वाढत होती तेव्हा दिल्लीत अधिवेशन चालू होते वास्तविक अनेक खासदार अधिवेशन बरखास्त करण्याची वारंवार विनंती करत होते परंतु काही राजकीय हेतुंसाठी या विनंतीकडे दुर्लक्ष केले गेले, तर काही सन्मानीय सदस्य सभागृहात मास्क परिधान करून आले असता त्यांना मास्क काढण्याचे आदेश दिले गेले . अचानकपणे पूर्वनियोजन न करता देशात लॅकडाऊन जाहिर केल्यामुळे अनेक स्थलांतिरीत मजदूर, कामगार, विद्यार्थी यांना आपापल्या मूळगावी जाण्यासाठी अनेक कठिण परिस्थितींना सामोरे जावे लागले त्यात काहींना जीव देखील गमवावे लागले तर दुसरीकडे कोरोना चा उद्रेक हा पर्यावरणातील अती मानवी हस्तक्षेपामुळे झाल्याचे अनेक तज्ञांचे मत आहे, असे असताना सुध्दा केंद्रीय पर्यावरण मंत्री अनेक पर्यावरणाला घातकच असणारया विकासकामांना या जीवघेण्या आपत्तीत सुध्दा सहमती देत आहे. एकंदरीत ही सर्व परिस्थिती पाहता भाजपाचे नेते, पदाधिकारी किती निष्काकाळजीपणे व बेजबाबदारपणे वागत आहे हेच यावरून सिध्द होते, परंतु मला असे प्रामाणिकपणे वाटते की ही वेळ राजकारण करण्याची नाही. आपण लोकप्रतिनाधी या नात्याने आपण ज्यांचे प्रतिनीधीत्व करीत आहोत त्यांची रक्षा करणे महत्वाचे आहे यासाठी आपण सर्वांनीच एकत्रित येवून सामुदायिक प्रयत्न करणे क्रमप्राप्त आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button