भटक्या कुत्र्यांचा हल्ला, पुण्यात चार वर्षांच्या मुलाला पडले १७ टाके
पुणे – चाकणमधील आंबेठाण परिसरात चार वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला असून यात चिमुकला गंभीर झाला आहे. त्या मुलाला सतरा टाके पडले असून या घटनेमुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
चाकणच्या आंबेठाण परिसरात लांडगे कुटुंब राहत असून कुटुंबातील चार वर्षांचा राजवीर हा बुधवारी दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर घरासमोरील शेतात मित्रांसोबत खेळत होता. काही वेळाने तो लघुशंकेसाठी शेतालगतच्या जागेवर गेला. तिथे भटक्या कुत्र्यांनी राजवीरवर हल्ला केला. भटक्या कुत्र्यांनी त्याच्या पायाचे लचके तोडले. घाबरलेला राजवीर मदतीसाठी ओरडू लागला. सुदैवाने त्याच्या आईने राजवीरचा आवाज ऐकला आणि तिने घटनास्थळी धाव घेत राजवीरची सुटका केली. राजवीर या घटनेत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजवीरला सतरा टाके पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले.