बस प्रवासात डुलकी घेताय ‘मग सावधान’
![‘Beware’ while taking a nap on bus journey](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/चोरी.jpg)
पुणे | प्रतिनिधी
बस प्रवास करत असताना डुलकी घेत असाल तर सावधान व्हा. आपल्याकडील मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची शक्यता आहे. नुकतीच तशी एक घटना घडली. खासगी कुरिअर सर्व्हिसमध्ये काम करणा-या कामगाराकडील ५ लाख ५० हजारांची रोकड असलेली बॅग चोरट्यांनी प्रवासादरम्यान चोरून नेली. ही घटना दोन दिवसांपूर्वी खासगी ट्रॅव्हल्स बसमध्ये घडली आहे. याप्रकरणी मयूर विठ्ठल मुळीक (वय २४, रा. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर एका खासगी कुरिअर सर्व्हिस कंपनीत कामाला आहे. ९ डिसेंबरला ते नगर ते पुणे असा आरामदायी बसने प्रवास करीत होते. त्यावेळी त्यांच्याकडे कुरिअर सर्व्हिसची जमा झालेली ५ लाख ५० हजार रूपयांची रोकड होती. प्रवासादरम्यान त्यांना झोप आल्यामुळे मयूरने बॅग डोक्याखाली ठेवली होती. नेमकी तीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्याकडील ५ लाख ५० हजारांची रोकड असलेली बॅग चोरून नेली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रताप गिरी तपास करीत आहेत.