फ्लॅटचे हप्ते थकले, त्यात शेजारणींचे टोमणे, तणावातून विवाहितेची आत्महत्या
![Suicide of a farmer in Punjab in the farmers' movement](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/suicide-loksatta-2.jpg)
पुणे | लॉकडाऊन काळात फ्लॅटचे हप्ते देऊ न शकल्याने झालेला वाद अन् त्यात शेजारी राहणाऱ्या महिला चारित्र्यावर संशय घेत टोमणे मारत असल्यामुळे पुण्यातील आंबेगाव खुर्द परिसरात एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैशाली राऊळ (वय 30) असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेच्या पतीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव खुर्द येथील शृष्टीलेक अपार्टमेंटमध्ये ही महिला पतीसह राहत होती. पती रिक्षाचालक तर मृत महिला ब्युटी पार्लर चालवत होती. तीन वर्षांपूर्वी त्यांनी शृष्टीलेक अपार्टमेंटमध्येच फ्लॅट घेतला होता. दरम्यान अचानक लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे रिक्षा थांबली, ब्यूटी पार्लरही चालनासे झाले. परिणामी घराचे हप्तेही थकले होते.
आरोपी महिला वैशाली राऊळ यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना टोमणे मारीत होत्या, असे फिर्यादीत म्हटले आहे. रविवारी (14 जून) या दोन महिलांचे आणि फिर्यादीच्या पत्नीचे याच कारणावरून भांडण झाले. यावेळी या दोन महिलांनी वैशाली राऊळ यांना फ्लॅटचा हप्ता भरू शकत नाही, तुझ्या घरी कुणीतरी येते असा आरोप करत तिच्या चारित्र्यावर संशय घेत अश्लील आरोप केले. चारित्र्यावर संशय घेतल्याचा धक्का वैशाली यांना सहन झाला नाही आणि त्यांनी त्याच दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली. वैशाली राऊळ ही एका ब्युटी पार्लरमध्ये काम करत होती तर तिचा नवरा रिक्षाचालक आहे. यांना दोन मुलं आहेत. जेव्हा आईने आत्महत्या केली त्यादरम्यान मुले खाली खेळण्यासाठी गेली होती.