प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार?
!['It is important to tell the dictatorial government that the people are the symbol of democracy'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/3prakash_ambedkar_31.jpg)
अकोला – वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते काँग्रेस महाआघाडीत सहभागी होण्याची शक्यता मावळली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मंगळवारी मुंबई येथे करण्यात येईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी सकाळी अकोला येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे कोणत्या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. वंचित आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी मी सोलापूरतून निवडणूक लढावी, अशी इच्छा व्यक्त केली असल्याचे आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यानुसार आंबेडकर सोलापुरातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मात्र त्यांनी याला अधिकृत दुजोरा दिला नाही. याबाबत निर्णय घेण्यासाठी लक्ष्मण माने, अण्णाराव, अशोक सोनोने आदी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांची आज (ता.11) रोजी बैठक होत आहे.
या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी अंतिम होईल. त्यानुसार मुंबईत घोषणा करण्यात येणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे आणि प्रदेश प्रवक्त राजेंद्र पातोडे यांची उपस्थिती होती.