पुण्यात ‘सोलापूर फेस्ट’चे उद्घाटन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/3Deshmukh_6.jpg)
पुणे : सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे पुण्यात पंडित फार्मस् येथे ‘सोलापूर फेस्ट’चे आज (शुक्रवार) उद्घाटन करण्यात आले. 16 ते 18 नोव्हेंबर या कालावधीमध्ये ‘सोलापूर फेस्ट’ या भव्य प्रदर्शन व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी दहा वाजता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी, गुरुबाबा महाराज अवसेकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
‘सोलापूर सोशल फाऊंडेशन’तर्फे सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व प्रगती यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. यापैकी एक नवीन उपक्रम म्हणजे ‘सोलापूर फेस्ट’. नोव्हेंबर 2018 मध्ये पहिले ‘सोलापूर फेस्ट’ पुण्यामध्ये पंडित फार्मस् येथे आयोजित करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा कापड उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे व त्याचबरोबर विविध शेती उत्पादने आणि खाद्यपदार्थ यांसाठीही प्रसिद्ध आहे. ‘सोलापूर फेस्ट’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुण्यातील नागरिकांना या उत्पादनांची खरेदी करता येणार आहे. तसेच अस्सल सोलापुरी चवीच्या खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येणार आहे. प्रदर्शनाच्या तीनही दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
शुभारंभाच्या दिवशी संध्याकाळी हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे यांचा एकपात्री कार्यक्रम हास्यकल्लोळ, उद्या (शनिवार) संध्याकाळी सामुदायिक अग्निहोत्र व त्यानंतर लोकसंगीत, रविवार (ता.18) रोजी पहाटगाणी या कार्यक्रमांचे नागरिकांच्या मनोरंजनासाठी आयोजन करण्यात आले आहे. भरपूर खरेदी आणि खाद्यजत्रेसह येथे लहान मुलांसाठी विशेष विभाग असल्यामुळे नागरिकांना या प्रदर्शनाचा सहकुटुंब आनंद घेता येणार आहे.