पुण्यात व्यावसायिकावर भरदिवसा गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/IMG-20201005-WA0024.jpg)
पुणे |महाईन्यूज|
पुण्यात भरदिवसा आज एका व्यावसायिकावर पोलिस आयुक्तालय व बंडगार्डन पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर दोघांनी गोळीबार केला. या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजेश कनाबार (वय 63, रा. सोपानबाग, घोरपडी) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
कनाबार यांचा इमारत सुशोभीकरणाचा व्यवसाय आहे. तर त्यांची बावधन येथे दहा एकर जमीन आहे. मात्र, या जमीनीबाबत त्यांचे काही जणांबरोबर मागील काही वर्षांपासून वाद आहेत. जमीनीच्या वादाचे प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल आहे. कनाबार यांच्या जमीनीसंदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुनावणी होणार होती. त्यासाठी ते दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले होते. सुनावणीचे काम उरकल्यानंतर ते दुपारी पावणेतीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आले. त्यानंतर ते शासकीय कोषागाराजवळ लावलेल्या त्यांच्या कारकडे गेले.
त्यावेळी तेथील फळविक्रेत्यांकडून फळे घेऊन ते कारमध्ये बसण्यासाठी येत होते. त्याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या दोघांनी त्यांना अडविले. त्यापैकी एकाने त्याच्या हातातील पिस्तुलातून कनाबार यांच्यावर गोळी झाडली. गोळी छातीवर डाव्या बाजूला लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर दोन्ही आरोपी तेथून लष्करच्या दिशेने पळून गेले. दरम्यान, कनाबार यांच्या चालकाने त्यांना त्यांच्या गाडीमध्येच बसवून तत्काळ खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र उपचारांपुर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, घटना घडल्यानंतर काही वेळातच पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, अतिरीक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, अतिरीक्त पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे, पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्यासह बंडगार्डन पोलिस ठाणे, गुन्हे शाखेच्या चार पथकांचे वरिष्ठ पोलिस अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
आरोपी लवकरच ताब्यात – डॉ.रविंद्र शिसवे
कनाबार यांचा खुन जमीनीच्या वादातुन आहे किंवा त्याला अन्य कोणती कारणे आहेत, याचा तपास सुरू आहे. घटनेनंतर तत्काळ सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून पोलिस ठाणे व गुन्हे शाखेची पथके आरोपींना शोधण्यासाठी रवाना केली आहेत. चालकाने सांगितल्यानुसार, गोळीबाराच्या घटनेत दोघांचा सहभाग आहे. काही तासातच या खुनाच्या प्रकरणाचा उलगडा होईल, असे पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांनी सांगितले.