breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात व्यापा-यांचा शंभर टक्के बंद; महासंघाच्या आढावा बैठकीत पुढील निर्णय

पुणे |महाईन्यूज|

करोनामुळे शहरात उद्‌भवलेली परिस्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी पुणे व्यापारी महासंघाने केलेल्या बंदच्या आवाहनाला व्यापाऱ्यांचा 100 टक्के प्रतिसाद मिळत आहे. शहरातील सर्व व्यापारी
19 मार्चपर्यंत बंद ठेवणार आहेत. गुरुवारी (दि.19) होणाऱ्या महासंघाच्या बैठकीत आढावा घेतल्यानंतर, पुढील निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती महासंघाच्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

शहरात करोना व्हायरस दुसऱ्या टप्प्यात असून, रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या व्हायरसचा पुढील टप्पा धोकादायक असल्याने त्यापासून बचावासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. याचे गांभीर्य लक्षात घेत, महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी (दि.16) पार पडली.

पुणेकरांच्या जीविताला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी व्यापाऱ्यांनी स्वत:चे आर्थिक नुकसान न पाहता समाजहिताला प्राधान्य देत दि.17 ते 19 मार्चदरम्यान सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पुणे शहरात 35 ते 40 हजार छोटे-मोठे व्यापारी असून, त्यावर 70 ते 80 हजार कामगार अवलंबून आहेत.

येत्या गुरुवारपर्यंत शहरातील व्यापारी सर्व व्यवहार बंद ठेवणार असल्याने राज्य सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे. या कालावधीत सर्व ग्राहक सहकार्य करतील, अशी अपेक्षा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button