पुण्यात महापौर पदासाठी भाजपची मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/murlidhar-moholdfa_201911326239.jpg)
पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|
पुण्याच्या महापौरपदासाठी सोमवारी भाजपकडून नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली तर उपमहापौरपदासाठी नगरसेविका सरस्वती शेंडगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. पुणे महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. ही दोन्ही पदे एक वर्षांसाठी असणार आहेत, असे पुणे भाजपच्या अध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी सांगितले.
पुण्यात महापौरपदासाठी भाजपकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार, याबद्दल गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता होती. मुरलीधर मोहोळ, धीरज घाटे, हेमंत रासने, वर्षा तापकीर, मंजुषा नागपुरे यांची नावे चर्चेत होती. पुणे महापालिकेसाठी यावेळी महापौरपद खुल्या गटासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळेच ही नावे चर्चेत आली होती.
मुरलीधर मोहोळ हे विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक होते. पण भाजपने या मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याने त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर महापौरपद खुल्या वर्गाला मिळाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांचे नाव पुढे आले होते. पुणे महापालिकेत भाजपचीच सत्ता असून भाजपचे ९९ सदस्य आहेत. महापौरपदासह सर्व पदांवर भाजपचेच नगरसेवक आहेत.