पुण्यात गेल्या 24 तासात 32 पोलीसांना कोरोनाची लागण
पुणे – पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासांमध्ये पुण्यात 32 पोलीसांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. आत्तापर्यंत पुण्यात सुमारे 740 पोलीसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पोलीस रात्रंदिवस रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावत आहे. त्यादरम्यान राज्यात अनेक पोलीसांना कोरोनाची बाधा झाली होती. मात्र त्यापैकी बहुतांश पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली असून, त्यानंतर ते पुन्हा आपल्या कर्तव्यावर रुजू झाले आहे.
दरम्यान, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्याच्या ऐवजी वाढतच चालला आहे. देशात रोजच हजारोंनी वाढणारी रूग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनत चालला आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात 75 हजार 760 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 1 हजार 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक रुग्णवाढ म्हणून नोंद करण्यात आली आहे.