पुण्यात गणपती विसर्जनासाठी कचऱ्याच्या कंटेनरचा वापर, मनसेने विसर्जन बंद पाडले
पुणे – पुणे शहरात गणपती विसर्जनासाठी कचऱ्याचे कंटेनर वापरल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. काल दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी महापालिकेने या कचऱ्याच्या कंटेन मध्ये फिरते हौद सुरू केले होते. या कचऱ्याच्या कंटेनरमधील हौदात गणेश विसर्जनास तीव्र विरोध करत मनसेने काल गणेश विसर्जन बंद पडले होते. आज ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी पुढे महापालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्याचे ठरविले होते. मात्र पोलिसांनी त्यांना जमा झाल्यावर काही वेळातच ताब्यात घेतले.
कोरोना व्हायरसच्या संकटाच्या काळात तलावांवर गणपती विसर्जनासाठी होणारी भक्तांची गर्दी टाळण्यासाठी पुणे महापालिकेने कचऱ्याच्या कंटेनरमध्ये फिरते हौद सुरू केले होते, असा आरोप करत काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या कंटेनर मधील फिरते हौद काल बंद पाडले होते. हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या प्रकरणी ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी पुणे महापालिकेच्या इमारतीसमोर आंदोलनकरण्याची धमकी दिली होती. आज हे कार्यकर्ते गोळा होऊ लागताच पुणे पोलिसांनी तात्काळ कारवाई करून या सर्वांना शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पकडून नेले. त्यानंतर पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. पुणे महापालिकेने खरोखरच कचऱ्याच्या कंटेनरमध्ये फिरते हौद तयार केले होते का? याची तपासणी स्वतः महापौर करीत आहेत.