पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना नवं संकट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/coronavirus-890x395-2.png)
पुणे | देशभरात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. मागील 24 तासांमध्ये तर देशात 4 हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. तर राज्यातही मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यातच पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना या व्हायरसपासून दूर असलेल्या पुण्यातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे
जनता वसाहत या झोपडपट्टीत कोरोनाचे तीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आधीच दाटीवाटीच्या वस्तीत कोरोनावर नियंत्रण मिळवणं अवघड होत असताना या सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाची एण्ट्री झाल्यामुळे प्रशासनावरील ताण वाढला आहे. आतापर्यंत जनता वसाहतीत कोरोनाचा शिरकाव झाला नसल्याने मोठं समाधान व्यक्त करण्यात येत होतं. मात्र आता काही बाधित रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनही सतर्क झाले आहेत.
दुसरीकडे, शहरातील भवानी पेठेत एकाच इमारतीत 48 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या संपूर्ण इमारतीत 584 जणांचे स्त्राव नमुने घेतले असून पैकी 131 जणांचे अहवाल प्राप्त त्यात 48 जणांना लागण झालेली आहे. तर 453 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या इमारत परिसराची पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. यावेळी भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी डॉ. सौरव राव, अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांच्यासह अधिकारी आणि स्थानिक उपस्थित होते.