पुण्यातील आजीबाईंचा लाठ्या-काठ्यांचा खेळ, प्रेरणादायी प्रवास
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/7-2.jpg)
अभिनेता रितेश देशमुख म्हणाले ‘लय भारी’
पुणे |महाईन्यूज|
लाठ्याकाठ्यांचा खेळ खेळून भल्याभल्यांना अचंबित करणाऱ्या पुण्याच्या आजीबाई सोशल मीडियावर स्टार झाल्या आहेत. 85 वर्षीय शांताबाई पवार यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखनेही आजींशी संपर्क साधला.
शांताबाई या वयातही अगदी सफाईने काठ्या फिरवत असल्याचे पाहून सर्व जण आश्चर्यचकित झाले आहेत. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी हे खेळ सादर करत असल्याचं त्यांनी सोशल मीडियावरील व्हिडीओत सांगितलं. वयाच्या आठव्या वर्षी शांताबाई पवार यांनी हा लाठ्याकाठ्यांचा खेळ (ढालपट्टा) खेळण्यास सुरुवात केली. या काळात ‘सीता और गीता’ सिनेमात ‘अनाडी है कोई खिलाडी है कोई’ या गाण्यात हेमा मालिनी यांच्या डमी म्हणून डोंबारी खेळ त्यांनी खेळले. याशिवाय त्रिदेव सिनेमा, एक मराठी चित्रपट अशी काही शूटींगही त्यांनी केली.
उघड्यावर पडलेल्या अनाथ मुलांसाठी काहीतरी करण्याची आपली इच्छा होती. त्यामुळे दहा अनाथ मुलींचा सांभाळ करते, तिघींना लग्न करुन सासरी पाठवले, असेही आजींनी सांगितले. कोरोनाची भीती होती, मात्र फिकीर न करता घर चालवण्यासाठी मी या काळातही बाहेर पडले, असं आजी सांगतात.
आजीबाई पुण्यात काठ्यांचा खेळ सादर करत असतानाचा व्हिडीओ शूट करुन कोणीतरी सोशल मीडियावर पोस्ट केला. अल्पावधीतच तो अनेक नेटिझन्सपर्यंत पोहोचलाही. अभिनेता रितेश देशमुख याने या आजीचं कौतुक करत कोणीतरी मला यांच्याशी संपर्क करुन द्या, असे ट्वीट काल रात्री केले होते. त्यानंतर, मी या लढवय्या ‘आजीशी बोललो, त्यांची कहाणी प्रेरणादायी आहे, असे त्याने सांगितले.