पुण्याच्या रस्त्यावर भरदिवसा गोल्डमॅन सचिन शिंदेची गोळी झाडून हत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/Capture4567-2.jpg)
पुणे – पुण्यात एक थरारक घटना घडली आहे. गोल्डमॅन म्हणून मिरवणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराची पुण्यातील लोणीकंद गावात भर रस्त्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सचिन शिंदे गुन्हेगाराचे नाव असून त्याच्या हत्येने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास लोणीकंद येथील ऍक्सिस बँकेच्याजवळ ही घटना घडली. सचिन शिंदे हा रस्त्याच्या बाजूला उभा होता, त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर बेछुट गोळीबार केला. यात सचिन शिंदेच्या मानेला एक गोळी लागली. गोळी लागल्यानंतर तो जागेवरच कोसळला. भर रस्त्यावर गोळीबाराची घटना घडल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पूर्ववैमनस्यातून सचिन शिंदेची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
लोणीकंदमध्ये सचिन शिंदे हा गोल्डमॅन म्हणून ओळखला जात होता. त्याच्यावर हत्येसह अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. शिक्रापूर आणि रांजणगाव एमआयडीसी भागामध्ये त्याची काही वर्षांपासून दहशत होती. एका प्रकरणात तो येरवडा तुरुंगात होता. काही दिवसांपूर्वीच तो येरवडा तुरुंगातून जामिनावर बाहेर आला होता.