पुणे : व्यावसायिकाकडून ५ लाखांची खंडणी; आतापर्यंत चार बोगस पत्रकारांना अटक
![Pune: Extortion of 5 lakhs by businessman; Four bogus journalists have been arrested so far](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/Mundhwa-Police-Station-pune-780x459.jpg)
पुणे : वृत्तपत्रात बातमी छापून व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन पाच लाख रुपये उकळणाऱ्या सहा बनावट पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चौघांना मुंढवा पोलिसांनी मंगळवारी (25 ऑक्टोबर) रात्री उशिरा अटक केली आहे.
मोद साळुंखे, वाजिद सय्यद, मंगेश तांबे आणि लक्ष्मणसिंग तंवर अशी अटक केलेल्या बनावट पत्रकारांची नावे आहेत. योगेश नागपुरे आणि ‘आत्मज्योती’च्या संपादक संजीवनी कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केशवनगर येथील दत्त कॉलनीतील एका गोडाऊनमध्ये 23 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती. याप्रकरणी तेजराम भीमाजी देसाई (वय 42, रा. केशव नगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशव नगर येथील दत्त कॉलनीत फिर्यादी यांचे गोडाऊन आहे. आरोपी प्रमोद साळुंके आणि वाजिद सय्यद हे रविवारी (२३ ऑक्टोबर) त्यांच्या गोदामात गेले तर मंगेश तांबे, योगेश नागपुरे, लक्ष्मणसिंग तंवर हे गोदामाच्या बाहेर थांबले होते.
प्रमोद साळुंखे यांनी फिर्यादीला सांगितले की, ते एका आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्राचे आणि आत्मज्योती पेपरचे पत्रकार आहेत. त्यांनी तक्रारदारावर यापूर्वी गुटख्याची विक्री करण्याबरोबरच गोदामात भेसळयुक्त धान्य विकून अवैध धंदा चालवल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात पेपरमध्ये वृत्त प्रसिद्ध करून बदनामी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पैसे न दिल्यास कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तक्रारदाराच्या मुलालाही मारहाण केली.
गुन्हा दाखल होताच मुंढवा पोलिसांनी बनावट पत्रकारांना अटक केली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, पोलीस निरीक्षक काकडे, सहायक पोलीस निरीक्षक कर्पे व पोलीस कर्मचारी नाना भांदुर्गे, हेमंत झुरुंगे, राहुल मोरे, राजू कदम, योगेश गायकवाड, वैभव मोरे यांनी केली.