पुणे महापालिकेच्या हद्दीत सिरो सर्वेक्षणामध्ये सुमारे 51.50 टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडी विकसित झाल्याचा निष्कर्ष
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/freepressjournal_2020-07_79a2fb7b-e9bb-4a93-8743-a8e20179a34e_0906_20200608274l.jpg)
पुणे महापालिकेच्या हद्दीत कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी किती प्रमाणात अँटीबॉडी विकसित झाल्या आहेत, याचा अंदाज घेण्यासाठी निवडक पाच प्रभागांमध्ये करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणामध्ये सुमारे ५१.५० टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडी विकसित झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. शास्त्रज्ञांनी रक्ताच्या नमुन्याच्या आधारे केलेल्या अभ्यासानुसार अँटीबॉडी विकसित झाल्याचे प्रमाण हे सुमारे ३६.१ टक्के ते ६५.४ टक्क्यांपर्यंत सर्व प्रकारच्या निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींमध्ये दिसून आले आहे.
या सर्वेक्षणासाठी पुणे महापालिकेच्या प्रत्येक प्रभागांमधील एक जुलैपर्यंतची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या विचारात घेऊन पाच प्रभाग निवडण्यात आले होते. त्यामध्ये कसबा पेठ-सोमवार पेठ, रास्तापेठ-रविवार पेठ, लोहियानगर-काशेवाडी, येरवडा आणि नवीपेठ-पर्वती या पाच प्रभागांचा समावेश होता. या पाच प्रभागांतील ६३ ठिकाणच्या एक हजार ६६४ व्यक्तींचे रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले. २० जुलै ते पाच ऑगस्ट या कालाधीत हे सर्वेक्षण केले गेले. या अभ्यासात संकलित करण्यात आलेल्या रक्ताच्या नमुन्यातील अँटीबॉडी तपासण्यासाठी चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये पाच प्रभागांमध्ये सरासरी ५१.५० टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडी विकसित झाल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वाधिक अँटीबॉडी या लोहियानगर-काशेवाडी या प्रभागांमध्ये विकसित झाल्याचे आढळून आले आहे. हा झोपडपट्टी असलेला परिसर आहे. सर्वांत कमी प्रमाण हे कसबा पेठ-सोमवारपेठ या प्रभागात ३६.१ टक्के असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
‘या सर्वेक्षणानंतर आणखी तीन सर्वेक्षण करण्यात येत आहेत. ससून रुग्णालयाकडून पुण्याचे, तर वायसीएम रुग्णालय आणि डी. वाय. पाटील संस्थेकडून पिंपरी चिंचवड महापालिकेचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठीही सर्वेक्षण करण्याचा विचार आहे. या अहवालातील निष्कर्षाच्या आधारे प्रशासनाकडून पुढील नियोजन केले जाणार आहे’ असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.