पुणे जिल्ह्यात ‘जमावबंदी आदेश’ लागू करण्याचा लवकरच निर्णय?
![Sarathi will not allow any shortage of funds - Ajit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/ajit.jpg)
पुणे |महाईन्यूज|
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात पुन्हा जमावबंदी आदेश लागू करण्यासंबदर्भात चर्चा सुरु आहेत. यावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह दोन्ही महापौरांशी चर्चा करुन प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा घेतला. बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (व्हिसीद्वारे), पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शहरी भागासह ग्रामीण भागातील कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी होणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन पुरेसा निधी उपलब्ध करुन देईल. रुग्णांना वेळेत ऑक्सिजनयुक्त खाटा व योग्य उपचार मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणेने गांभीर्याने काम करावे. ग्रामीण भागातील रुग्णांना त्याच भागात उपचार मिळवून देण्यासाठी ग्रामीण रुग्णालयांमध्ये पुरेशा आरोग्य सुविधा व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करुन द्यावीत.
येथील ऑक्सिजनयुक्त बेड व अन्य सोयी सुविधांसाठीची अपुरी कामे आरोग्य व सार्वजनिक बांधकाम विभागाने गतीने पूर्ण करुन घ्यावीत, अशी सूचना करुन नवीन बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित ग्रामीण रुग्णालयांसाठी विशेष बाब म्हणून तात्काळ पदनिर्मिती करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात गृह सर्वेक्षणावर भर देवून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम प्रभावीपणे राबवावी. यात लोकप्रतिनिधींसह स्वयंसेवी संस्था व नागरिकांना सहभागी करुन घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.