पुणे जिल्हा परिषदेत लवकरच विविध पदांची भरती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/5-2.jpg)
पुणे |महाईन्यूज|
जिल्हा परिषदेकडील विविध 714 रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या एकूण पदांपैकी 10 टक्के म्हणजेच 74 पदे ग्रामपंचायत कर्मचारी सेवा ज्येष्ठता यादीमधून शैक्षणिक अर्हतेनुसार व सेवा ज्येष्ठतेनुसार भरली जाणार आहेत. ही प्रक्रिया पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये पूर्ण होणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.
लोकसभा निवडणूक आचारसंहिता आणि त्यानंतर पुन्हा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने प्रक्रिया पूर्ण होऊनदेखील नियुक्ती आदेश दिले गेले नव्हते. या प्रश्नी काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोठा मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा 10 टक्के सेवक भरतीचे आदेश काढले जातील, असे आश्वासन तत्कालीन अध्यक्ष देवकाते यांनी दिले होते. त्यानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून जिल्हा परिषद सेवक म्हणून भरावयाच्या 10 टक्के जागांची भरतीसाठी हालचाली झाल्या. त्यामुळे दीर्घकाळ रखडलेली सेवक भरती प्रक्रियेला मुहूर्त लागला आहे.