पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भाजपाच्या महापौरांचे तोंडभरुन कौतुक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/7-6.jpg)
पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, खासदार शरद पवार यांच्या समोरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे तोंडभरून कौतुक केले. कोरोना संकट काळात महापौर हे चांगले काम करीत आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, अशा शब्दांत त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.
पुणे शहरातील कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच मैदानात उतरले आहेत. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांनी बैठक घेतली. यावेळी विविध अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
कोरोनाच्या संकट काळात पुणे महापालिका चांगले काम करीत आहे. मोठा आर्थिक भारही उचलत आहे. पुणे महापालिकेवर भाजपची एक हाती सत्ता आहे. तरीही अजित पवार यांनी आज शरद पवार यांच्या समोर महापौर मुरलीधर मोहोळ यांचे कौतुक केल्याने उपस्थित अधिकारी आणि लोकप्रतिनिधीमध्ये खमंग चर्चांना उत आला होता.
एरव्ही अजित पवार रोखठोक म्हणून ओळखले जातात. आज मात्र त्यांच्या या स्वभावाची वेगळीच झलक पहावयास मिळाली. पुणे शहरात 14 हजारांच्या पुढे कोरोना रुग्ण गेले आहेत. तर, 558 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या नागरिकांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते. त्याची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांनी शरद पवार यांना दिली.
मला यापुढे तक्रारी नको, एकत्रितपणे काम करा…
कोरोनाचे संकट गंभीर झाले असताना मी रोज सकाळी सात वाजता चार अधिकाऱ्यांना फोन करून आढावा घेतो. त्याच प्रकारे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी रोज आमदार, खासदारांना फोन करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मला यापुढे तक्रार नको, एकत्रितपणे काम करा, अशा सूचनाही पवार यांनी दिल्या आहेत.