पुणेकर विद्यार्थ्यांच्या पत्राला पंतप्रधानांचे पुस्तकभेटीसह उत्तर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/pun02-4.jpg)
- दहावीच्या परीक्षेसाठी पंतप्रधानांकडून शुभेच्छा!
पुणे महापालिकेच्या औंध येथील अहिल्यादेवी होळकर इंग्लिश मीडियम स्कूलमधील लक्ष्मण मनीष प्रजापती या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने पाठवलेल्या पत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून थेट प्रतिसाद मिळाला. दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देत पंतप्रधानांनी त्यांच्या ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकाची प्रत भेट म्हणून लक्ष्मणला पाठवली आहे. पंतप्रधानांकडून पत्राला उत्तर आल्याने लक्ष्मण भारावून गेला आहे.
मूळचे उत्तर प्रदेशातील असलेले प्रजापती कुटुंब गेल्या पंधरा वर्षांपासून पुण्यात वास्तव्याला आहे. विद्यापीठ रस्त्यावरील चाफेकरनगर परिसरातील छोटय़ाशा घरात लक्ष्मण राहतो. त्याचे वडील नारळविक्रीचा व्यवसाय करतात. लक्ष्मणने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले होते. ‘तुमच्या ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकाविषयी मी ऐकले आहे, पण मला ते पुस्तक घेता आलेले नाही. मला त्या पुस्तकाची प्रत हवी आहे. माझ्या औंध-शिवाजीनगर परिसरात पुस्तक कुठे मिळू शकेल का? माझी दहावीची परीक्षा जवळ आली आहे,’ असे त्याने पत्रात लिहिले होते. त्या पत्राची दखल घेऊन पाठवलेल्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष्मणला दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देत सोबत पुस्तकही पाठवले आहे. ‘परीक्षेकडे उत्सव म्हणून पहा आणि स्मितहास्याने परीक्षेला सामोरा जा. हे पुस्तक तुला मार्गदर्शक ठरेल अशी आशा आहे. या परीक्षेत तू नक्कीच यशस्वी होशील याची मला खात्री आहे. भविष्यातील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा!’ अशा शब्दांत पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
‘देशाच्या पंतप्रधानांकडून माझ्या पत्राला उत्तर आल्याचा खूप आनंद वाटतो. पंतप्रधानांनी एका मुलीच्या पत्राला उत्तर पाठवल्याचे मी वाचले होते. त्यावरून मला पत्र लिहिण्याची प्रेरणा मिळाली. पंतप्रधानांना रोज कितीतरी कामे असतील, पण माझ्या पत्राला त्यांनी उत्तर दिल्यामुळे ते माझे प्रेरणास्थान झाले आहेत,’ असे लक्ष्मणने सांगितले. पंतप्रधानांनी पत्राला उत्तर पाठवल्यामुळे माझ्या मित्रांनाही आनंद झाला. तू पत्र कसे लिहिलेस, असे मित्र विचारू लागले. पंतप्रधानांनी पाठवलेले पुस्तक वाचून झाल्यानंतर आता ते मित्रांना वाचायला दिले आहे, असेही लक्ष्मण म्हणाला. माझ्या मुलाच्या पत्राला एवढय़ा मोठय़ा व्यक्तीने उत्तर दिल्याचा खूप आनंद झाल्याची भावना लक्ष्मणची आई गुड्डी यांनी व्यक्त केली.
आयुक्तांकडून प्रतिसाद नाही..
अहिल्यादेवी होळकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये निम्न आर्थिक गटातील सुमारे दोन हजार विद्यार्थी शिकतात. अभ्यासेतर उपक्रम म्हणून काही विद्यार्थ्यांचा पत्रलेखन क्लब तयार करण्यात आला आहे. शाळेत आणि परिसरात कचराकुंडी नसल्याने लक्ष्मणने कचराकुंडीची व्यवस्था करण्याबाबत पुणे महापालिकेच्या आयुक्तांनाही पत्र पाठवले होते. पंतप्रधानांकडून लक्ष्मणच्या पत्राला उत्तर मिळाले, मात्र आयुक्तांनी अद्याप पत्राची दखल घेतलेली नाही.
९५ टक्के गुण मिळवण्याचा ध्यास
लक्ष्मण सध्या दहावीच्या परीक्षेची तयारी करत आहे. पुढे त्याला चित्रकार व्हायचे आहे. त्यामुळे दहावीनंतर कला शाखेत प्रवेश घेण्याची त्याची इच्छा आहे. दहावीला ९५ टक्के गुण मिळवण्याचे ध्येय समोर ठेवून तो अभ्यास करत आहे.
पंतप्रधानांकडून पत्राला उत्तर आल्याने लक्ष्मण आणि त्याच्या वर्गातील इतर मुले प्रोत्साहित झाली आहेत. या पत्रामुळे पत्रलेखन शिकण्यासह त्याच्या गाठीशी खूप चांगल्या आठवणी जमा झाल्या आहेत. – गौरव सिद्धार्थ, लक्ष्मणचे शिक्षक
पंतप्रधानांच्या ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकात परीक्षेला सामोरे जाण्यासाठीचे २५ मंत्र दिले आहेत. ताण न घेता परीक्षेची तयारी कशी करावी याबाबत मार्गदर्शन आहे. हे पुस्तक माझ्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरले आहे. – लक्ष्मण प्रजापती