नुकसानग्रस्त शेतक-यांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – चंद्रकांत पाटील
- भिवरीतील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतपीकांचा केला पाहणी दौरा
- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतक-यांना दिला दिसाला
पुणे | महाईन्यूज
राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातल्यानं मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणासह राज्याच्या अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यापार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टीनं बाधित झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असलेल्या भिवरी येथील अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या भागाची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत आदी उपस्थित होते.
नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केल्यानंतर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणं शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. तसेच अतिवृष्टीनं बाधित झालेल्या शेतजमिनीचे, फळबागांचे पंचनामे ६ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावे,” अशा सूचना पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.