नदीपात्रात गुडमॉर्निंग पथकाची कारवाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/pmc-1-2.jpg)
- 15 जणांवर कारवाई
- मालकांना नोटीसा बजाविणार
पुणे : मुठा नदीच्या काठावर उघडयावर शौचास बसणाऱ्या सुमारे 12 ते 15 जणांवर महापालिकेच्या वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या गुडमॉर्निंग पथकाने कारवाई केली. हे सर्वजण बांधकाम मजूर असून परिसरातील बांधकामांवर कामास आहेत. त्यामुळे बांधकामाच्या ठिकाणी स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध करून दिली नाही म्हणून त्या बांधकाम व्यावसायिकांना महापालिकेकडून कारवाईची नोटीस बजाविली जाणार असल्याची माहिती वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सह महापालिका आयुक्त गणेश सोनूने यांनी दिली. तसेच ही कारवाई यापुढेही सुरूच ठेवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेकडून शहर हगणदारी मुक्त करण्यासाठी मोठया प्रमाणात शहरात वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यात आलेली आहेत. तर ज्या ठिकाणी स्थलांतरीत मजूरांच्या अथवा बांधकाम मजूरांच्या वस्त्या आहेत.
त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट उभारण्याची जबाबदारी संबधित बांधकाम व्यावसायिकांना बंधनकारक आहे.मात्र, त्यांच्याकडून सुविधा देण्यात येत नसल्याने तसेच दिलेल्या सुविधेच्या ठिकाणी अस्वच्छता असल्याने हे मजूर नदीपात्र अथवा उघडयावर शौचालयास जातात. गेल्या काही दिवसात कर्वेनगरच्या परिसरात मुठा नदी काठच्या बाजूला स्माशानभूमी ते महालक्ष्मी लॉन्सच्या मागील बाजू पर्यंत हा प्रकार सुरू होता. नागरिकांकडूनही त्याबाबत तक्रारी करण्यात येत होत्या अखेर कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाने गुडमॉनिंग पथक नेमून सकाळी साडे सहा ते आठ वाजे पर्यंत या ठिकाणी सुमारे 15 जणांवर कारवाई केली आहे. तसेच ही तपासणी मोहीम या पुढेही सुरू ठेवली जाणार आहे. राज्यशासनाने महापालिकेस दोन वर्षांपूर्वीच महापालिकेस हगणदारीमुक्त शहर मोहीम घोषीत केले होते.मात्र, त्यानंतर पुन्हा अशी ठिकाणे शहरात निर्माण होत असल्याने त्याची गंभीर दखल घेत लवकरच या प्रकारांना आळा घालण्यासाठी शिट्टी आणि काठी पथक तसेच गुडमॉर्निंग पथकांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख उपायुक्त सुरेश जगताप यांनी सांगितले.