धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर वडिलांकडूनच अत्याचार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/crime_2017071370-6.jpg)
पिंपरी- देहूरोड भागात वडील मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका नराधमाने पोटच्या मुलीवरच अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका १२ वर्षांच्या मुलीवर तिच्या वडिलांनीच अत्याचार केल्याची बाब समोर आली. पीडित मुलीची आई मंगळवारी नातेवाईकांकडे गेली होती. तर पीडित मुलीचा भाऊ बाहेर खेळायला गेला होता. तर मोठ्या मुलाला या नराधमाने जाणून बुजून किराणा आणण्यासाठी पाठवले. त्यानंतर अल्पवयीन मुलीला घराच्या हॉलमध्ये बोलवत कोयत्याच्या धाकाने तिच्यावर अत्याचार केले. तसेच याची वाच्यता कुणाहीकडे करशील तर तुला जीवे मारेन अशी धमकी दिली. पीडित मुलीने हा सगळा प्रकार आपल्या काकूला सांगितला. मुलीच्या काकूने मुलीच्या आईला फोनवर या सगळ्याची माहिती दिली. त्यानंतर आज पहाटे याप्रकरणी देहूरोड पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली. माझे वडील गेल्या वर्षभरापासून माझ्याशी अश्लील वर्तन करत आहेत, अशी कबुली या मुलीने दिली.