दूध खरेदी दरात १ रुपयाने वाढ; शेतकऱ्यांना नवीन वर्षांची भेट
पुणे |महाईन्यूज|
दूध उत्पादक शेतक-यांना पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून (कात्रज डेअरी ) नवीन वर्षाची अनोखी भेट दिली आहे. खाजगी दूध संघाकडून खरेदी दर कमी केला जात असताना कात्रज दूध संघाने आपल्या शेतक-यांना 1 जानेवारी पासून गायीच्या दुधासाठी प्रति लीटर 1 तर म्हैशीच्या दुधासाठी प्रति लीटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचे संघाचे अध्यक्ष विष्णु हिंगे यांनी सांगितले.
खरेदी दरात वाढ केली असली तरी विक्रीच्या दरात कोणतीही वाढ केली जाणार नाही, असे हिंगे यांनी स्पष्ट केले. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची 61 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोना व्हायरस संसर्गाचे पार्श्वभूमीवर बुधवारी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा घेणारा पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ हा राज्यातील पहिला सहकारी संघ आहे.
सभेच्या सुरुवातीस संघाचे चेअरमन विष्णु हिंगे यांनी संघाने केलेल्या कामकाजाची माहिती दिली. संघाला सन 2019-2020 या आर्थिक वर्षांत 2 कोटी 48 लाख 85 हजार इतका निव्वळ नफा झालेला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लि.1 रुपयांप्रमाणे एकूण सुमारे 6 कोटी 94 लाख रुपये दोन टप्प्यात देण्यात येणार असून, पैकी प्रति लीटर 50 पैसे प्रमाणे होणारी रक्कम दिवाळीपूर्वी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अदा केली आहे. तर उर्वरित रक्कम मार्च 2021 पूर्वी अदा केली जाणार आहे. सभेमध्ये 218 संस्था प्रतिनिधींनी सहभाग घेतला. सभेचे कामकाज अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. कोरोना कालावधीत संघाने चांगल्याप्रकारे कामकाज केल्याबद्दल सभासदांनी संचालक मंडळाचे आभार मानले.