दुचाकीस्वारावर गोळीबार करून लुटले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/gun-shots.jpg)
चाकण:- एक तरूण दुचाकीवरून जात असताना दोन तरूणांनी रस्त्यात आडवले. त्याला रस्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून त्या तरूणांनी त्याच्या पायावर गोळीबार केला. ही घटना मंगळवारी (दि.२३) रात्री नऊच्या सुमारास आळंदी ते चाकण घाट रस्त्यावर घडली.
प्रवीण हनुमंत शिंदे (वय २७, रा. राजगुरूनगर. मुळ रा.सांगली) असे जखमी तरूणाचे नाव आहे.त्यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास आळंदी होऊन चाकण घाट रस्त्याने तो त्याच्या दुचाकीवरून (एम एच १४/जी क्यू ८६०९) जात होता. एमआयटी कॅालेज जवळ आले असता पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याला आडवले. दुचाकी चालवणाऱ्या एकाने प्रवीण यांना ‘हा रस्ता चाकणकडे जातो का’ असे विचारले.
त्यानंतर दुचाकीवर मागे बसलेल्या तरूणाने रिव्हॅाल्वर काढली. त्याने प्रवीण यांच्या पायावर गुडघ्याजवळ गोळी झाडली. यात प्रवीण जखमी झाला. त्यानंतर तरूणाने प्रवीण यांची दुचाकी आणि रोकड असा एकूण २० हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी आळंदी पोलीस तपास करीत आहे.