दीनानाथ रुग्णालयाच्या आयसीयूमधील जादूटोणा प्रकरणी चौकशी समिती स्थापन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/dinanath-jadu-tona.jpg)
-
ससूनची तज्ज्ञ समिती करणार महिलेच्या मृत्यूची तपासणी
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आयसीयुमध्ये उपचार घेत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला होता. यामध्ये खासगी डॉक्टर सतीश चव्हाण याने आयसीयुमध्ये मांत्रिक बोलावून मंत्र – तंत्र व उतारा केला असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. येथील उपचाराबाबत संशय असल्याने संबंधित महिलेचा भाऊ महेश याने मांत्रिक प्रकरणाबरोबरच उपचारामध्ये वैद्यकीय निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करीत सखोल चौकशीची मागणी केली होती. या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी ससून रुग्णालयातील पाच तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
संध्या गणेश सोनवणे (वय 24, रा. दत्तवाडी) या महिलेचा मार्च महिन्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील आयसीयुमध्ये उपचार घेताना मृत्यू झाला होता. त्यापूर्वी खासगी डॉक्टर सतीश चव्हाण याने आयसीयुमध्ये मांत्रिक बोलावून मंत्र – तंत्र व उतारा केला होता. या प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
संध्याच्या मृत्यूनंतर मांत्रिक आणि त्याला घेऊन येणारा डॉक्टर सतीश चव्हाण यांच्याविरुध्द अलंकार पोलीस ठाण्यात जादुटोणा प्रतिबंधक कायदयानुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान, दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी संध्या या स्वारगेट परिसरातील डॉ. सतीश चव्हाण यांच्याकडे उपचार घेत होत्या. दीनानाथ रुग्णालयातील उपचाराबाबत संशय असल्याने संध्याचा भाऊ महेशने मांत्रिक प्रकरणाबरोबरच उपचारामध्ये वैद्यकीय निष्काळजीपणाबाबत सखोल चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंखे यांनी हे प्रकरण ससूनच्या मेडिकल बोर्डकडे पाठवले आहे. संध्या यांच्या सुरवातीपासून उपचारांची माहिती घेऊन त्यामध्ये वैद्यकीय निष्काळजीपणा झाला आहे का नाही, हे ठरवणार असल्याची माहिती रुग्णालायचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली.