दाभोलकर हत्याप्रकरणी अॅड. पुनाळेकर, विक्रम भावे विरोधात ‘सीबीआय’चे पुरवणी दोषारोपपत्र दाखल
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या विरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून बुधवारी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकर याला अॅड. पुनाळेकर यांनी शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला तसेच भावे याने संशयित आरोपी कळसकर आणि सचिन अंदुरे यांना बरोबर घेऊन डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यापूर्वी घटनास्थळाची पाहणी केली, असे सीबीआयकडून दोषारोपपत्रात म्हटले आहे. अॅड. पुनाळेकर यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार कळसकरने ठाणे येथील खाडी पुलावरून पिस्तूल फेकून दिले. भावे याने कळसकर आणि अंदुरे यांच्याबरोबर घटनास्थळाची पाहणी केली. डॉ. दाभोलकर यांची हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून कसे पसार व्हायचे, याबाबतची माहिती दिल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे. सीबीआयचे तपास अधिकारी आर. आर. सिंग आणि विशेष सरकारी वकील अॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी बुधवारी दोषारोपपत्र दाखल केले.