थिएटरमध्ये बाहेरील पदार्थ खाण्यास अडविल्यास थेट करा तक्रार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/सिनेमा.jpg)
पुणे – मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये ‘बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास मनाई आहे’, अशा सुचना केलेल्या फलक लावलेले असतात. शहरातील बहुतांश मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ, पाण्याची बाटली घेऊन जाण्यास मज्जाव केला जातो. मात्र, हा प्रतिबंध कोणत्याही कायद्यामध्ये बसत नाही. त्यामुळे याविरोधात नागरिकांना १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवता येणार आहे. याबाबत जिल्हा पुरवठा अधिका-यांकडे तक्रारही नोंदवता येते. मात्र, नागरिक जागरुकते अभावी तक्रार नोंदवित नसल्याचे दिसून येत आहे.
थिएटरमध्ये सिनेमा पहायला जाताना लहान मुले किंवा वृध्द सोबत असतील, तर घरचे पदार्थ घेऊन जाणे अनिवार्य ठरते. बरेचदा, मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या किंमतीही सामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या असतात. त्यामुळे, घरगुती पदार्थ घेऊन जाणे, सोयीचे ठरते. मल्टिप्लेक्समध्ये ग्राहकांना अनेकदा बाहेरुन आणलेले पदार्थ नेऊ दिले जात नाहीत. पाण्याच्या बाटल्याही सुरक्षारक्षक बाहेर काढून टाकायला सांगतात. मात्र, अशा प्रकारची सक्ती ही मूलभूत अधिकारांवर गदा आणणारी आहे, याकडे नागरिकांचे लक्ष वेधण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
नागरिकांनी संबंधितांना अशी मनाई कोणत्या कायद्याच्या आधारे केली जात आहे, याचा जाब विचारण्याचा अधिकार असतो. याबाबत नागरिकांना राज्य पुरवठा अधिका-यांकडे टोल फ्री क्रमांकावर तक्रारही नोंदवता येते.
दरम्यान, मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदी केली जाते. त्याविरोधात नागरिक तक्रार नोंदवू शकतात. तक्रार दाखल झाल्यास रितरस चौैकशी करुन मल्टिप्लेक्सचालकांना नोटीस पाठवता येते, असे जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार यांनी सांगितले.