तेजस्विनी बसमधी महिला मोफत प्रवास योजना गुंडाळणार?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/1-3.jpg)
पुणे |महाईन्यूज|
पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये मोठा गाजावाजा पीएमपीच्या तेजस्विनी बससेवेत महिलांना दर महिन्याच्या आठ तारखेला देण्यात येणाऱ्या मोफत बस प्रवासाच्या सवलतीवर संक्रांत येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे यंदाच्या आठ मार्चला महिलांना अखेरचा मोफत बस प्रवास असू शकेल. महापालिकेने त्यासाठी आर्थिक तरतूद केली तर, पुढील काळात ही सुविधा प्रवासी महिलांना उपलब्ध होऊ शकणार आहे.
राज्य सरकारने विशेष उपक्रमांतर्गत पीएमपीला गेल्यावर्षी ४ मार्च रोजी प्रवासी महिलांसाठी ३३ बस दिल्या आहेत. त्या बसला तेजस्विनी बससेवा असे म्हटले जाते. गेल्यावर्षी महिला दिनाचे औचित्य साधून महापालिकेने दर महिन्याच्या आठ तारखेला तेजस्विनी बसमधून महिलांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
गेल्यावर्षी घोषणा करताना ही सवलत एक वर्षांसाठी असेल, असे महापालिकेने म्हटले होते. यंदाच्या आठ मार्चला या सवलतीचा अखेरचा दिवस आहे. त्यानंतर पीएमपीला ही सवलत सुरू ठेवायची असेल तर महापालिकेकडून त्यासाठी तरतूद होणे अपेक्षित आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद झालेली नाही. त्यामुळे ही सवलत सुरू राहणार का, याकडे प्रवासी महिलांचे लक्ष लागले आहे.
महिला स्पेशल बस पीएमपीने सुरू केली होती. परंतु, पुरेसा प्रतिसादाअभावी आता तेजस्विनीमधून सर्वच प्रवाशांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. महिला स्पेशल बस सुरू असताना, दरमहा सुमारे अडीच लाख महिला या ३३ बसमधून प्रवास करीत होत्या. ही बससेवा सुरू ठेवायची असेल तर, महापालिकेला दरवर्षी किमान ३६ लाख रुपये पीएमपीला द्यावे लागणार आहेत.