डेक्कन एक्स्प्रेसचे सारथ्य महिलांकडे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-81.png)
पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेसला गुरुवारपासून म्हणजे ५ मार्च पासून अत्याधुनिक एलएसबी प्रकारातील आकर्षक डबे जोडण्यात आले आहेत. त्यानिमित्ताने गुरुवारी गाडीचे सारथ्य महिलांकडे देण्यात आले. चालक, गार्ड, तिकीट तपासनीस आणि सुरक्षा व्यवस्थाही महिलांकडे असणारी ही गाडी दुपारी मुंबईकडे उत्साही वातावरणात रवाना करण्यात आली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/ESW3GyyUYAAa50o-1024x882.jpg)
पुणे- मुंबई दरम्यान दररोजचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये डेक्कन क्वीनप्रमाणेच प्रसिद्ध असलेल्या डेक्कन एक्स्प्रेसला १९९५ मध्ये नवे डबे जोडण्यात आले होते. त्यानंतर सुमारे २५ वर्षांनी गाडीला नवे अत्याधुनिक तंत्राचे १६ डबे जोडण्यात आले आहेत. आकर्षक रंगसंगती आणि आरामदारी आसनव्यवस्थेमुळे हे डबे प्रवाशांच्या पसंतीस पडले आहेत. प्रत्येक डब्यामधील आसनव्यवस्था १२ आसनांनी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे एका डब्यात १०८ प्रवाशांऐवजी १२० प्रवासी बसू शकतात.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/ESW3HUiU0AAZhrE-1024x505.jpg)
नव्या स्वरूपातील ही गाडी दुपारी सव्वातीनच्या सुमारास पुण्यातून रवाना होत असताना विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रेल्वे प्रशासन आणि रेल्वे प्रवासी ग्रुपच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महिला प्रवाशांना पुणे रेल्वेच्या व्यवस्थापक रेणू शर्मा, अपर व्यवस्थापक नीलम चंद्रा यांच्या हस्ते पुष्पांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे रेल्वे प्रवासी सुविधांबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षां शहा यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.