टेमघर धरण दुरुस्तीचे काम वेगाने सुरू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/temghar-dam-.jpg)
पुणे– शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असणाऱ्या टेमघर धरण दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. या धरणातून होणारी गळती थांबविण्यासाठी ग्राऊटींगचे काम सुरू असून दररोज 14 ते 15 तास हे काम करण्यात येते. पावसाळ्यापूर्वी धरण दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचा निर्धार जलसंपदा विभागाने केला आहे.
टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याने हे धरण दुरुस्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यासाठी जलसंपदा विभागाकडून 100 कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. टेमघर धरण दुरुस्तीसाठी रिकामे करणे आवश्यक होते. त्यानुसार या धरणाचे पाणी खाली असलेल्या खडकवासला धरणात सोडून देण्यात आले. त्यानंतर धरण दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. सुमारे दिड वर्षांपासून धरण दुरुस्तीचे काम सुरू आहे. सध्या धरण दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. दुरुस्तीचे काम 14 ते 15 तास सुरू आहे.
टेमघर आणि वरसगाव धरणातून मोठ्याप्रमाणात पाणी गळती होत होती. ही गळती थांबविण्यासाठी ग्राऊटींगचे काम हाती घेण्यात आले आहे. ग्राऊटींगचे काम करताना धरणाच्या भिंतीला छिद्र पाडून त्यात मोठ्या दाबाने सिमेंट सोडण्यात येते. जेणे करुन गळती होणारी ठिकाणे बंद होतात. धरणात पाणी असताना हे काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे यंदा सर्वात आधी वरसगाव आणि टेमघर धरणाचे पाणी खडकवासला धरणात सोडून ही दोन्ही धरणे रिकामी करण्यात आली आहे, अशी माहिती जलसंपदा खात्याचे पुणे विभागाचे मुख्य अभियंता ता. ना. मुंडे यांनी दिली.