‘झीरो पेंडन्सी अॅण्ड डेली डिस्पोजल’ कार्यपद्धती राबविणार – आयुक्त हर्डीकर
पिंपरी – महापालिकेचा कारभार अधिक गतिमान होण्यासाठी ‘झीरो पेंडन्सी अॅण्ड डेली डिस्पोजल’ कार्यपद्धती राबविण्यात येणार आहे. या कार्यपद्धतीची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सक्त सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विभागप्रमुखांना दिले आहेत. मुदतीमध्ये कामे पूर्ण न केल्यास संबंधित अधिकार्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
‘झिरो पेंडन्सी अॅण्ड डेली डिस्पोजल’ कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचे आदेश राज्य शासनाने पालिकेस 15 फेबु्रवारीला दिल्या आहेत. त्यानुसार या कार्यपद्धतीची दोन टप्प्यात अंमलबजावणी केली जाणार आहे.पालिकेचे मुख्य कार्यालय, क्षेत्रीय कार्यालय व अन्य सर्व कार्यालयाचे काम अद्ययावत करणे, नागरिकांच्या व प्रशासकीय कामकाजात होणारा विलंब टाळून सर्व थकीत प्रकरणांचा निपटारा करण्याची कार्यपद्धती आहे.
कार्यालय स्वच्छ ठेवून, कार्यालयातील सर्व कक्षांतील अभिलेखांचे निंदणीकरण, वर्गीकरण व अद्ययावतीकरण करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. तत्पर प्रशासन अंतर्गत कार्यालयात प्राप्त व प्रलंबित प्रकरणे निकाली काढाव्यात. त्या दृष्टीने कार्यपद्धती राबविण्यात यावी, असा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. ‘डेली डिस्पोजल’ अंतर्गत प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचार्यांकडे दर दिवशी प्राप्त झालेल्या प्रकरणांवर त्याच दिवशी कार्यवाही करण्यात यावी. ही कार्यवाही अद्ययावत पद्धतीने केली जावी. सदर कामकाजाची वार्षिक अहवालाची नोंद संबंधित अधिकारी व कर्मचार्यांच्या गोपनीनय अभिलेखांच्या मूल्यमापनात (मॅटर) केली जाणार आहे.
प्रत्येक कार्यालयाकडे प्राप्त, निकाली व प्रलंबित संदर्भ व प्रकरणांची माहिती जमा करणे, त्यावर संस्करण करणे आणि वरिष्ठ अधिकारी किंवा कार्यालयांसाठी माहिती ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी संगणकीय प्रणालीचा उपयोग करण्यात यावा. याबाबत सुयोग्य आज्ञावली माहिती व तंत्रज्ञान विभाग विकसित करणार आहे. या कामकाजात अ,ब,क,ड वर्गीकरण, सह गठ्ठे पद्धती, लिपिकांनी ठेवावयाच्या नोंदवह्या, अभिलेख कक्ष, त्यांचे अद्ययावतीकरण, माहितीचे संकलन व प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी कार्यपद्धती याचे प्रशिक्षण कामगार कल्याण विभागाकडून देण्यात येणार आहे. या कार्यपद्धतीची तातडीने अंमलबजावणी करण्याचा सूचना आयुक्त हर्डीकर यांनी विभागप्रमुखांना दिल्या आहेत.