जेजुरीच्या हुंडीत ईस्ट इंडिया कंपनीची नाणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/U.jpg)
- दोनशे वर्षांपूर्वीची नाणी एकत्र गुंफलेल्या अवस्थेत मिळाली
लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जेजुरी येथील खंडोबाच्या गुप्त हुंडीमध्ये म्हणजेच दानपेटीत ब्रिटिश काळातील चार नाणी आढळली आहेत. चांदी आणि तांबे या धातूंचा वापर करून घडविलेली दोनशे वर्षांपूर्वींची ही नाणी एकत्रित स्वरूपात गुंफलेली आहेत. ईस्ट इंडिया कंपनीचा छाप असलेले १८१८मधील नाणेही यामध्ये समाविष्ट आहे.
जेजुरी येथील श्री खंडोबाच्या चरणी अनेक भाविक दानपेटीतून गुप्तदान अर्पण करतात. जेजुरी गडावरील गुप्त हुंडी मंदिर व्यवस्थापन आणि विश्वस्तांच्या उपस्थितीत मोजदाद करण्यासाठी नुकतीच उघडण्यात आली.
भक्तांनी अर्पण केलेले दान हुंडीतून काढताना चार नाण्यांचा हा एकत्रित गुंफलेला ऐवज आढळला, अशी माहिती खंडोबा मंदिराचे व्यवस्थापक दत्तात्रेय दिवेकर यांनी दिली. यापूर्वीही खंडोबाच्या चरणी अशा प्रकारचे गुप्तदान अर्पण करण्यात आले आहे. व्हिक्टोरिया राणीचा छाप असलेली २७ नाणी देवस्थानकडे यापूर्वीच जमा झाली आहेत. त्यात आता या चार नाण्यांची भर पडली आहे, असेही दिवेकर यांनी सांगितले.
दोनशे वर्षांपूर्वीची नाणी ही अलीकडच्या इतिहासाची साक्षीदार आहेत, असे नाण्यांचे अभ्यासक पद्माकर प्रभुणे यांनी सांगितले. या नाण्यांची घडण, छाप, आकार, धातूचा वापर आणि त्यावरील रतलाम ही अक्षरे ही नाणी वापरात असल्याची निदर्शक वाटतात. एक नाणे होळकरांचे आहे.
मात्र १८१८ मधील ईस्ट इंडिया कंपनीचे नाणे हे समकालीन बनावट (फोर्जरी) असावे, अशी शंका घेण्यास वाव आहे. आणा हे चलन आता इतिहासजमा झाले असले तरी इतिहास अभ्यासाच्यादृष्टीने ते महत्त्वाचे साधन ठरते, असेही प्रभुणे यांनी सांगितले.
अशी आहेत नाणी
जेजुरीच्या हुंडीत मिळालेल्या नाण्यांपैकी १८१८ मधील ईस्ट इंडिया कंपनीचा मूळ छाप असलेले नाणे दुर्मीळ मानले जाते. दुसरे नाणे १८७१ मधील व्हिक्टोरिया राणीच्या छापाचे असून ते चांदीचे आहे. तिसरे नाणे तांब्याचे असून, ते १८९१ मधील आहे. ते पाच आण्याचे आहे. तर, चौथे १९०६ सालातील एक आण्याचे तांब्याचे नाणे आहे. ही नाणी चलनात नसावीत, मात्र ती ताईत स्वरुपात गळ्यात घातली गेली असावीत, याकडे पद्माकर प्रभुणे यांनी लक्ष वेधले.